Shivaji, Shivaji Chalisa, Marathi 5261
Hindustani, Reed Organ, Tabla, bells, Very Fast
00:00 / 00:00
Lyrics
1
गणाधीश जो पुत्र दुर्गा-शिवाचा, करी दान जो ज्ञान विद्या सुवाचा.
करूँ मान सत्कार मा-शारदा चा, शिवाजी च औतार श्रीशंकराचा.
2
गणेशा! तुला मागणे हेचि नाथा! लिहूं मी शिवाची यथासांग गाथा.
उमा-पार्वती-अम्बिके पूज्य माता! शिवा-शंकरा! द्या मला ज्ञान आता.
3
समर्था! तुझे फार आभार देवा! तुझे श्लोक माझा महाज्ञान ठेवा.
शिवा! तो शिवाजी-स्वरूपें नमूँ मी, रचोनी शिवा-श्लोक मोदें रमूँ मी.
4
यदा ही अधर्मास येतो उकाळा, उभारावयाला फिरोनी सु-काळा.
जगी ईश घेतो पुन्हा जन्म नक्की, करायास आस्था सदिच्छेत पक्की.
5
शिवाजी जसा जाणता थोर राजा, सदाचार आदर्श ज्याचा समाजा.
न भूतो न भूयो भवेद्वा पुनर्वै, न झाला, न होईल, ऐसा पुन्हा ही.
6
भवानी प्रसन्ना सदा ती जयाला, दिली दिव्य संगीन श्रीने तयाला.
असा सद्गुणी आवडे जो जगाला, जगी धन्य राजा शिवाजी जहाला.
7
जगी निंद्य ते सर्व सोडून राही, जनीं वंद्य ते जो करी सर्व काहीं.
असा कोण राजा जगीं या जहाला, नमस्कार माझा शिवाजी नृपाला.
8
मनी वासना दुष्ट नाही जयाच्या, मनी बुद्धि पापिष्ट नाही जयाच्या.
कधीही न जो नीति सोडून जातो, महाभाग राजा शहाणा शिवा तो.
9
मनी पाप-संकल्पना ज्यास नाही, मनी सत्य-संकल्पना ज्यास राही.
मनी वासना ज्यास ना त्रास देतीं, जनीं त्या, शिवाजी असे नांव देती.
10
जयाचे मनी ना कधी क्रोध भारी, जयाचे मनी खेद नाही विकारी.
जयाचे मनी मत्सरा वाव नाही, जगी त्या शिवाला सदा मान राही.
11
मनी श्रेष्ठ धारिष्ट हे लक्ष्य ज्याचे, जनीं हीण-शब्दांस दुर्लक्ष त्याचे.
स्वयें सर्वदा नम्र वाचा वदे जो, जनीं तो शिवा सर्वदा मोद देतो.
12
जया स्वार्थ नाही, परार्थी खरा जो, न वांच्छा करी दूसर्यांचे जरा जो.
रुजे ना जयाला कधी कर्म खोटे, रुते ते शिवाच्या मनीं दुःख मोठे.
13
सदा सर्वदा प्रीत ज्याला शिवाची, नसे त्यास पर्वा कधीही जिवाची.
सुखें सर्व दुःखें सदा तुल्य ज्याला, समाबुद्धियोगे खरे मुल्य त्याला.
14
सुखें सर्व ज्याला असोनी हि प्राप्त, मनीं जोचि स्वातंत्र्य उत्साह व्याप्त.
तया पुण्य ते पूर्वजन्मींच प्राप्त, शिवा तो करी सर्व चिंता समाप्त.
15
मनी मानसी-यातना जो न जाणी, कधी शोक-चिंता मनी तो न आणी.
तितीक्षा तया विग्रहे पूर्ण पृक्त, असा तो शिवाजी तदाकार उक्त.
16
प्रजेची सुरक्षा न केली कदाही, तयाची अरीनेच केली तबाही.
कळे सत्य ऐसे जया सर्वकाही, शिवाजीस त्या काळ देतो गवाही.
17
विना वासना जो करी कर्म सारे, उरे कर्मयोगी मरोनी तथा, रे!
जसा जन्मतां मृत्यु नक्कीच येतो, तसा तो मरोनी पुन्हा जन्म घेतो.
18
जगी जन्म घेतीं मरोनीच सारे, तरी, मृत्यु नाही जया कीर्ति तारे.
जगी कीर्ति पावोनि जो नित्य झाला, शिवाजी असे नांव मृत्युंजयाला.
19
महावीर कित्येक आले नि गेले, उरें तेचि जे कीर्तिरूपी न मेले.
जसे कृष्ण-रामादि जे मर्त्य नाही, तसा तो शिवाजी सदा स्तुत्य राही.
20
जया शास्त्रवाणीवरी भक्ति राहे, तया आत्मविश्वस ही शक्ति आहे.
मनी ज्यास देवावरी भाव पक्का, जनीं त्यास कोणीहि मारे न धक्का.
21
जयाला सदा सत्य हे देव आहे, तयाला न मिथ्याचिये भेव राहे.
शिवं सुंदरं हे जया तत्त्व आहे, शिवा हीच संज्ञा तया विश्व वाहे.
22
जगी जन्म-जन्मीं सदा कीर्ति ज्याची, मनीं सर्वकाळीं वसे स्फूर्ति त्याची.
झिजोनी शिवा चंदनाचे परी तो, जनीं पावना धी सुगंधे करी तो.
23
जिजाऊ जया लाभली पूज्य आई, तयाचे मुखी यातना शब्द नाही.
सदा मायभूमीवरी गर्व ज्याला, इथेची मिळाला खरा स्वर्ग त्याला.
24
जपे सर्वदा नाम जो वेळ सारा, तया सर्व वेळीं प्रभूचा सहारा.
मनीं पार्वती-शंकराचा पहारा, मिळे मोक्ष त्याला, चुके येरझारा.
25
जयाचे मनीं ईश्वरी भाव राहे, कृपेने तया श्रीशिवा नित्य पाहे.
मृतात्म्यास त्या कोणता मार्ग राहे, जया द्वार नक्की खुले स्वर्ग आहे.
26
शिवाचे कृपेने असे साध्य सर्व, तरी कां धरावा मनी व्यर्थ गर्व.
सदा सर्वदा नाम त्याचे म्हणावे, भजावे रटावे व वाचे वदावे.
27
कधी वीट वाटू नये गायनाचा, विना नाम-उच्चार वाचाळ वाचा.
सुखाने घडी लोटते नाम घेता, सदा नाम आहे मुखी तोच जेता.
28
करे नाम रक्षा, टळे विघ्न सारे, विना नाम त्याला व्यथा तिग्म मारे.
करोनी सदा अर्चना शंकराची, टळे आपदा सर्व ही त्या नराची.
29
भये जो न भ्याला, असा तो शिवाजी, भवानी सदा छत्र त्याच्या जिवाची.
शिवा सारखा राखणारा जयाला, बळें कोण मारील दैवी शिवाला.
30
दिनानाथ ज्याचा महादेव आहे, तया काळ ही सर्वदा दूर राहे.
जया काळभैरो स्वयं राखणारा, तया काय चिंता करे कोंडमारा.
31
सदा सर्वदा देव सर्वत्र आहे, तुझ्या आंतल्या गुप्त आत्म्यास पाहे.
बघोनी तयाला कृपादृष्टि-भावे, तुझी पूर्ण चिंता सदा त्यास राहे.
32
यथा सांगतीं सर्व शास्त्रें पुराणें, यथासांग अंगी समाधान बाणे.
तरी तू चलावे तयांचे प्रमाणे, सदा सांगती हे, मनीषी शहाणे.
33
करी भ्रष्ट अंधार आदित्य जैसा, करी नष्ट विघ्नें तुझी शंभु तैसा.
तरी तू शिवाला सश्रद्धा भजावे, सदा नाम त्याचे मनी गात जावे.
34
कुठे चांगले काय तो बोध घ्यावा, स्वयं आपला लाभ नीत्या करावा.
करावे सदा कृत्य नांवें शिवाचे, वदावे सदा सर्वदा गोड वाचे.
35
असे अंतरी भाव भक्तास जैसा, वसे अंतरी तो महादेव तैसा.
तरी नित्य सांभाळुनी बा मनाला, करी कार्य,” हे तो शिवाजी म्हणाला.
36
शिवाने जसे कार्य संपन्न केले, जसे मातृभूमीस ह्या धन्य केले.
तयाचे असो नित्य ध्यानी प्रमाण, करोनी तया गान देवासमान.
37
गडांच्या शिरीं उच्च बांधोनि किल्ले, महाराष्ट्र-स्वातंत्र्य आपन्न केले.
अकस्मात मारोनि छापे झणाणें, चिरंजीव केली प्रथा ती शिवाने.
38
हनूमान औतार श्री शंकराचा, करी नष्ट तो दंभ लंकेश्वराचा.
शिवाजी तसा दूसरा तो शिवाचा, करी नाश पापाचरी दानवांचा.
39
महेशाचिया सेवका वक्र पाहे, असा ह्या जगी वीर बा कोण आहे.
यथासांग लीला तया ह्याच ग्रंथी, बघोनी असो तुष्ट तो एकदंती.
40
मरोनी उरे कीर्ति ज्याची जगात, सरोनी उरे प्रीति त्याची जनांत.
जगी जन्म ज्याने दिला ह्या शिवाला, नमस्कार माझा सदा त्या शिवाला.